Dr. Kamathe Piles Hospital

Marquee Stop on Hover
Cashless Facility Available, Mediclaim Reimbursement Available, Video Rectoscopy Available, Laser Treatment Available . Branches - Pune , Mumbai.

Email us at

info@doctorpile.com

Contact us

+91-8888866185

२० नोव्हेंबर – जागतिक मुळव्याध दिन – जीवनशैली बदला ,मुळव्याध घालवा.

आजकाल प्रत्येकाची जीवनशैली पूर्णपणे बदललेली आहे यामुळे लाइफस्टाईलशी निगडित आजार हे मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसतात. सर्जरीचे जनक आचार्य सुश्रुत यांनी हजारो वर्षांपूर्वी मुळव्याध या आजाराविषयी संपूर्ण माहिती ‘ सुश्रुतसंहिता’ या ग्रंथांमध्ये दिलेली आहे मुळव्याध कसा ओळखावा? त्याचे निदान काय? कारणे काय? त्याचे उपाय काय ?तसेच उपचार काय काय आहेत? याबाबतीत पूर्णपणे माहिती ही त्यांनी दिलेली आहे.

सुमारे चारशे वर्षांपूर्वी हिप्पोक्रे तस जे आद्य सर्जन मानले जातात यांनी देखील मुळव्याधा विषयी अनेक गोष्टी लिहून ठेवल्या आहेत .

१८१५ साली नेपोलियन राजाला मुळव्याधीचा त्रास सुरू झाला होता या वेदना इतक्या भयान होत्या की त्याला घोड्यावर बसणे देखील कठीण होते, यामुळे फ्रान्सला युद्धामध्ये हार पत्करावी लागली आणि त्यानंतर काही दिवसात मृत्यू देखील आला .

असा हा अतिशय वेदनादायी व त्रासदायक असणारा आजार जगातील अनेक राजांना ,अति अति प्रमुख व्यक्तींना, खेळाडूंना होऊन गेला आणि ज्यामुळे त्यांचे संपूर्ण करिअर अस्ताव्यस्त झाले तसेच अति महत्त्वाच्या कामांपासून त्यांना विमुक्त व्हावे लागले काहींना या आजारामुळे त्यांच्या पदापासून राजीनामा देखील द्यावा लागला कोणताही भेदभाव न बाळगणारा हा आजार सर्वसामान्यांपासून राजांपर्यंत कोणालाही होताना दिसतो. यामुळे जागतिक आरोग्य संघटना यांनी अतिशय दूरदृष्टीने विचार करून हा आजार होऊ नये किंवा झाला तर त्यासाठी काय करावे तसेच या आजारात बद्दल जनसामान्यांमध्ये प्रचार प्रसार व्हावा जनजागृती व्हावी या उद्देशाने 20 नोव्हेंबर हा जागतिक मूळव्याध दिन म्हणून घोषित केला.

भारतामध्ये देखील या आजाराचे करोडो रुग्ण आपणास दिसून येतात जसजशी जीवनशैली उंचावत जाते व्यायामाचा अभाव निर्माण होतो, पारंपारिक खाण्यामध्ये मोठा बदल होतो त्यावेळेस अशा व्यक्तींमध्ये मुळव्याधी सारखा त्रास होताना मोठ्या प्रमाणात दिसून येतो अनेक व्यक्तींमध्ये आजही या आजाराबाबत लज्जा भीती व जागरूकता दिसून येत नाही. या कारणांमुळे या आजाराकडे दुर्लक्ष केले जाते व त्याचे उपचार केले जात नाहीत यामुळे साध्या मुळव्याधी पासून ते कॅन्सर पर्यंतचे रोग होताना मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात.

या आजाराविषयी व आपण काही माहिती घेवूयात.

मुळव्याध व्याख्या :-

गुदद्वाराच्या आतल्या व बाहेरच्या भागातील फुगलेल्या व सुजलेल्या दुखणाऱ्या रक्तवाहिन्यांना मुळव्याध असे म्हणतात. या रोगास संस्कृतमध्ये ‘अर्श’ असे नाव आहे. यामध्ये दोन प्रकारचे रोग आहेत – विनारक्तस्राव व रक्तास्रावासहित. या रोगात गुदद्वाराच्या सभोवताली आतमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत ठणकल्यागत वेदना होते. क्वचित रक्तस्राव पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्राव झाल्यास रक्त कमतरता ,ॲनिमिया होतो. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः नष्ट होत जाते. या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेशी आहे.

भारतात आजघडीस साधारणतः कोट्यावधी लोकांना हा आजार आहे आणि दरवर्षी या आजाराचे १० लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात. काही काळापूर्वी मुळव्याध हा साधारण चाळीशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता १८ ते २५ या वयोगटातील स्त्री- पुरुषांनाही मुळव्याध होऊ लागली आहे. एकूण रुग्णांपैकी १० ते १२ टक्के रुग्ण हे १८ ते २५ वयोगटातील आहेत. हा रोग कोणालाही सहजपणे होतो म्हणुन दरवर्षी २० नोव्हेंबर हा दिवस जगभर जागतिक मुळव्याध दिन म्हणून साजरा होत असतो.

पूर्वरूप

सूज येणे, अग्निमांद्य, अन्न न पचणे, बलहानी, पोटात गुडगुड आवाज येणे, पोटाचा रोग झाला आहे असे वाटणे, इत्यादी. मुळव्याध हा गुदद्वाराच्या आतील तसेच बाहेरील भागाचा आजार असून यामध्ये गुदद्वाराच्या रक्तवाहिन्या फुगतात, सुजतात, त्या ठिकाणी वेदना होतात, तसेच यातून रक्तस्राव देखील होतो.

मुळव्याधाची लक्षणे :

  • शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना,
  • शौच विधीच्या वेळेस रक्त पडणे,
  • गुदभागी खाज, गुदातून चिकट पदार्थ येणे – आव पडणे.
  • गुदभागी कोम्ब-मोड-कुडी-गाठ येणे.
  • पूर्ण पोट साफ न झाल्यासारखे वाटत राहते, गुदभागी काहीतरी आहे असे सतत जाणवत राहते.
  • भूक मंदावणे – शौच विधीच्या वेळेस गुदभागी वेदना व रक्त-स्राव होतो या कारणामुळे रुग्ण जेवण कमी करू लाग़तो. परंतु याचा तोटा जास्ती होतो, कमी जेवणामुळे बद्धकोष्ठता वाढते तसेच
  • मुळव्याधीचा त्रासही वाढतो.
  • रुग्णाचे वजन कमी होते.
  • मुळव्याधीच्या सततच्या त्रासामुळे दैनंदिन कामामध्ये अडथळा निर्माण होतो.
  • अ‍ॅनिमिया- मुळव्याधीमध्ये रक्त-स्राव झाल्यामुळे शरिरातील रक्ताचे प्रमाण कमी होते या अवस्थेला अ‍ॅनिमिया असे म्हणतात.

मुळव्याधीचे प्रकार

अ) उत्पत्ती स्थानानुसार प्रकार

उत्पत्ती स्थानानुसार म्हणजेच मुळव्याध नक्की कुठल्या ठिकाणी होते त्यानुसार तिचे २ प्रकार पडतात.

१)अंतर्ग़त मुळव्याध :- गुदद्वाराच्या आत होणाऱ्या मुळव्याधीला अंतर्ग़त मुळव्याध असे म्हणतात. या प्रकारच्या मुळव्याधीमध्ये वेदना कमी प्रमाणात व रक्तस्राव जास्त प्रमाणात असतो.

२) बाह्यः मुळव्याध :- गुदद्वाराच्या बाहेरील भागात होणाऱ्या मुळव्याधीला बाह्यः मुळव्याध असे म्हणतात. या प्रकारच्या मुळव्याधीमध्ये वेदना व रक्तस्राव अत्यल्प असतो, परंतु खाज जास्त प्रमाणात असते.

ब) मुळव्याधाचे प्रकार अवस्थेनुसार:

मुळव्याधीचा आजार किती बळावलेला आहे, त्यानुसार त्याचे ४ अवस्थांमध्ये वर्गीकरण केले जाते.

प्रथम अवस्था – Grade 1

जेव्हा गुदभागी अल्पप्रमाणात वेदना, खाज व आग होते, तेव्हा त्यास प्रथम अवस्था असे म्हणतात. या अवस्थेत मुळव्याधीचा उपचार केल्यास औषधोपचाराने मुळव्याध पूर्णपणे बरा होऊ शकतो.

द्वितीय अवस्था- Grade 2

जेव्हा प्रथम अवस्थेतील गुदभागी वेदना, खाज व आग ही लक्षणे वाढतात. तसेच बद्धकोष्ठता होते, पोट साफ होत नाही. गुदाच्या ठिकाणी कोम्ब आल्यासारखा जानवणे, त्या ठिकाणी वेदना खाज होते. रक्तस्राचे प्रमाण प्रथम अवस्थेपेक्षा वाढते तेव्हा त्यास व्दितीय अवस्था असे म्हणतात. यामध्ये मुळव्याधाचे कोम्ब शौच विधीच्या वेळेस गुदद्वाराच्या बाहेर येतात व शौच विधीच्या नंतर ते बाहेर आलेले कोम्ब आपोआप आत जातात. या अवस्थेत मुळव्याधाचा उपचार व पथ्य पालन केल्यास औषधोपचाराने मुळव्याध पूर्ण बरे होतो.

तृतीय अवस्था- Grade 3 बद्धकोष्ठता, शौचाच्या वेळी त्रास, रक्तस्राव, दाह,खाज ही लक्षणे व्दितिय अवस्थेपेक्षा वाढतात. या अवस्थेमधे शौच विधीच्या वेळेस गुदद्वाराच्या बाहेरआलेले मुळव्याधाचे कोम्ब आपोआप आत जात नाहीत, ते तसेच गुदद्वाराच्या बाहेर राहतो, कोम्बाला बोटांनी आत ढकल्या नंतरच कोम्ब आत जातो. या अवस्थेत मु मुळव्याधाचा उपचार व पथ्यपालन केले तरी ही काही रुग्णांमधे औषधोपचाराने मुळव्याध बरे होण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे या अवस्थेत शल्यचिकित्सा म्हणजेच ऑपरेशन करावे लागू शकते. चतुर्थ अवस्था‌- Grade 4 चतुर्थ अवस्थेत तृतिय अवस्थेतील लक्षणे वाढतात. ही गंभीर अवस्था आहे, या अवस्थेत उपचारास विलंब करु नये. यामध्ये शौच विधीच्या वेळेस गुदद्वाराच्या बाहेर आलेले मुळव्याधाचा कोम्ब आपोआप आत जात नाहीत, तसेच तो बोटानी ढकलून सुद्धा आत जात नाही ते तसेच गुदद्वाराच्या बाहेर राहतात. या चतुर्थ अवस्थेत मूळव्याधाचा उपचार फक्त शल्यचिकित्सेने म्हणजेच ऑपरेशन द्वारेच होऊ शकतो.

कारणे:

मुळव्याधाची कारणे काय आहेत?

  • १. बद्धकोष्ठता- पोट साफ न होणे. बद्धकोष्ठता ची कारणे – शौचविधीच्या वेळेस जोर करणे, कुंथण्यामुळे मुळव्याध होऊ शकते . व्यायामाचा अभाव, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कडक मलप्रवृत्ती, मलावरोध, सतत अति उष्ण(गुणाने) पदार्थ खाणे, वातकारक व रुक्ष पदार्थ खाणे, अतितिखट सेवन, सतत बैठे काम, अनियमित दिनचर्या, रक्तदोष, वेळच्यावेळी शौचास न जाणे, अति जागरण तसेच व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भावस्था, आमांश अशा अनेक बाबींमुळे गुदद्वारावर जोर द्यावा लागतो.
  • २. शौच्याच्या वेळेस कुंथणे/ जोर करणे
  • ३ गर्भधारणेदरम्यान – गर्भाचे वजन आतड्यावर पडते, त्यामुळे बद्धकोष्ठता होते
  • ४.प्रसूतीनंतर – प्रसुतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते.
  • ५. चुकीची आहार पद्धती – फास्ट फुड व कमी फायबर युक्त आहाराचे सेवन
  • ६. बराच काळ एका जागी बसून राहणे.
  • ७. लिवर सिरोसीस सारख्या आजारामुळे
  • ८. अनुवंशिकता
  • ९. अतिमांसाहार, अतितिखट आहार खाण्यामुळे मुळव्याध होण्याची शक्यता वाढते.
  • १०. रक्तवाहिण्यांचे आजार

पथ्य (काय खावे)

जेवणात काय खावे : दूध, तुप, ताक, फळे, पालेभाज्या, सुरण, गाजर, काकडी, टोमॅटो, मुग, भात, कारले, चवळी, भेंडी, दोडके, दूधी, तोंडले, ज्वारी, गहु इ. वापर जास्त करावा.

हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असे चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घेणे आवश्यक असते.

रोज भरपूर पाणी पिणे, नाश्ता व जेवण वेळच्यावेळी घेणे हे आवश्यक असते

रोज दुपारी दही,ताजे ताक प्यावे.(आंबट नव्हे) प्यावे.

रोज रात्री कोमट दूध मध्ये २ चमचा तूप घालून प्यावे

सुरण खावे.

इसबगोलचा भुसा आणून त्यात पाणी घालून रात्री भिजत ठेवावे व सकाळी ते गाळून प्यावे.

कोणते पदार्थ खाऊ नये :

बटाटा, हरभरा, वाटाणे, मटकी, दही, मटन, मासे, अंडी, चिकन, बाजरी, उडीद, मेथी चमचमीत पदार्थ, शिळे अन्न, मावा, तंबाखू, दारू, बोडी, सिगारेट, जास्त गोड, तिखट, मसालेदार, फास्टफुड, आंबवलेले पदार्थ, थंडपेय इत्यादी.

काही उपाय:

जात्यादि तेलात कापूस तेलात भिजवून थोडी रात्री गुदा मार्गाच्या आत ठेवावा. अर्शकुठार रस , त्रिफळा चूर्ण घ्यावे.

मुळव्याध रोगासाठी योगाभ्यास:- मण्डूकासन , शशकासन , गोमुखासन , वक्रासन , योगमुद्रासन , पवनमुक्तासन , पादांगुष्ठनासास्पर्शासन , उत्तानपादासन , नौकासन , कंधरासन , सर्व प्राणायाम व विशेषतः मूलबंधाचा अभ्यास करावा .

मुळव्याध आधुनिक चिकित्सा पर्यायः- मुळव्याध जर प्रथम व व्दितीय अवस्थेत असेल तर ते औषध-ग़ोळ्या-मलमा द्वारे बरे होऊ शकते.

. १) वेदनाशामक औषधे २) Laxative ३) अ‍ॅन्टिबॉयोटिक्स ४) मु ळव्याधाचा आकार कमी करण्यासाठी गोळ्या ५) वेदनाशामक‌ मलम +मुळव्याधाचा आकार कमी करण्यासाठीची
औषधे+अन्टिबॉयोटिक्स+सुज कमी करणारे अशा सर्व घटकांना एकत्र करून तयार केलेला मलम दिला जातो. मलम शौच्याला जायच्या आधी व शौच्याला जाऊन आल्यानंतर मुळव्याधावर लावतात.
बिनटाक्याच्या व विना-चिरफाड मूळव्याध उपचार पद्धती :- या मध्ये प्रामुख्याने खालील ४ उपचार पद्धतींचा समावेश होतो
मुळव्याधाचे इंजेक्शन,- मुळव्याध प्रथम अवस्थेत (लहान कोंब) असल्यास मु ळव्याधीच्या कोम्बांच्या मुळाशी इंजेक्शन दिल्या जाते ही बिनटाक्याची व विनाचिरफाड मुळव्याध उपचार पद्धती आहे

रिंग बॅंडिंग (रिंग टाकणे), :- व्दितीय अवस्थेतील मुळव्याध (थोडा मोठा कोंब) असल्यास मुळव्याधाच्या मुळावर बॅंड (रिंग) लावून मुळव्याधाच्या कोंबाचा रक्तप्रवाह बंद केला जातो. यामुळे काही दिवसांत कोंब बारिक होतो, सुकतो, कुजतो आणि लावलेल्या रिंगसह गळून बाहेर पडतो. ही बिनटाक्याच्या व विनाचिरफाड मु ळव्याध उपचार पद्धती आहे.

क्रोयोसर्जरी अती थंड अश्या लिक्विड नायट्रोजनद्वारे मुळव्याधाचा कोंब गोठवला जातो. हा कोंब नंतर गळून जातो. ही बिनटाक्याच्या व विनाचिरफाड मूळव्याध उपचार पद्धती आहे

इन्फ्रारेड फोटोकोऑगुलेशन, या उपचार पद्धतीत इंफ्रारेड किरणांचा वापर केला जातो, ही किरणे मुळव्याधावर सोडली जातात, त्यामुळे उष्णता निर्मान होते, मुळव्याध जळून नष्ट होते. गुदद्वाराच्या आतील बाजुच्या मूळव्याध कोंबाच्या उपचारा साठीच या उपचार पद्धतिचा वापर केला जातो. ही बिनटाक्याच्या व विनाचिरफाड मुळव्याध उपचार पद्धती आहे

तृतीय किंवा चतुर्थ अवस्थेतील मुळव्याधासाठी (कोंब मोठे असल्यास, गुदद्वाराच्या बाहेर येत असल्यास किंवा खूप जुनाट असल्यास) या पद्धतीच्या शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे, वेदनाशामक औषधे, अंन्टिबॉयोटिक्स घेणे गरजेचे असते.

लेझर लेसर किरणांचा मुळव्याधावर मारा केला जातो, लेसर किरणांच्या संम्पर्कात आल्यामुळे कोंब जळून नष्ट होते. यामध्ये कोणतीही चिरफाड केली जात नाही, तसेच टाकाही घेतला जात नाही. यामध्ये कमीत-कमी रक्तस्राव होतो. लेझर ही नवीन ऑपरेशनची पद्धत, मुळव्याधाच्या रूग्णासाठी एक वरदानच आहे.

क्षार कर्म आयुर्वेदातले अतिशय जुनी उपचार पद्धती असून आजार आचार्य सुश्रुत यांनी या उपचारांविषयी सखल वर्णन सुश्रुत संहितेमध्ये केलेले दिसून येते यामध्ये विविध वन औषधी पासून एक पेस्ट तयार केली जाते व ती पेस्ट व मूळव्याधीच्या कुंबांवरती लावली जाते यामुळे एक रासायनिक प्रक्रिया कुंभार वरती होते व मुळव्याधीचे कोण नष्ट होतात अतिशय शास्त्रशुद्ध , नैसर्गिक पद्धत व सुरक्षित उपचार पद्धती ही मानले जाते.

अशा पद्धतीने मुळव्याध हा आजार जरी सर्वसामान्य वाटत असला तरी तो अतिशय वेदना देणारा असतो हेही तितकेच खरे त्यामुळे या आजाराकडे कोणत्याही प्रकाराने दुर्लक्ष न करता योग्य वेळी योग्य तज्ञांचा सल्ला घेऊन वेळीच उपाय करून यातनं मुक्त होऊन आपले सुंदर जीवन प्रत्येक व्यक्तीने जगावे. 20 नोव्हेंबर हा जागतिक मुळव्याध दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने आपण जीवनशैली यामध्ये बदल घडवून हा आजार होऊ नये जरी झालेला असेल तरी तो वाढू नये व बरा व्हावा यासाठी ज्या उपाययोजना कराव्या लागतील त्या स्वतःसाठी लवकरात लवकर करून मुळव्याध मुक्त जीवन जगण्याची शपथ घ्यावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

EN_US
Scroll to Top